नक्षल-ग्रस्त गडचिरोलीतल्या ३५ मुले आणि १६ मुली अश्या एकूण ५१ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतली !

नमस्कार,

मी सध्‍या गृहमंत्री पदाबरोबरच गडचिरोली जिल्‍ह्याचा पालकमंत्री म्‍हणूनही काम करीत आहे.

गडचिरोली जिल्‍ह्याला अनेक समस्‍यांना तोंड द्यावे लागते. हा भाग दुर्गम असून महत्‍वाचे म्‍हणजे नक्षलग्रस्‍त भाग म्‍हणून ओळखला जातो. प्रशासनाला इथपर्यंत पोहोचण्‍याकरिता खूप अडचणी येतात. त्‍यामुळे ख-या अर्थाने विकास इथपर्यत पोहोचतच नाही. अजूनही १३२ गावे वीजेशिवाय तर काही गांवे रस्‍त्‍याशिवाय आहेत. दारिद्र्य रेषेखाली जगणा-यांची संख्‍या मोठी असून मानवी विकास निर्देशांकात हा जिल्‍हा शेवटच्‍या क्रमांकावर आहे. याचाच फायदा घेत नक्षलवाद्यांकडून क्रांतीची एकमेव घोषणा केली जाते.

मी जेव्‍हा गडचिरोली जिल्‍ह्याचा पालकमंत्री झालो तेव्‍हा या गोष्‍टीचा मी सखोल विचार केला. नक्षलवाद्यांना अपेक्षित असलेल्‍या क्रांतीचा प्रतिकार विकासाच्‍या क्रांतीने व्‍हायला हवा, तोही गतीमान पध्‍दतीने. पण त्‍याची सुरुवात कोठून करावयाची हा खरा मुद्दा होता आणि तोच कळीचा मुद्दा आहे.

नक्षलवादी एकीककडे विकास होऊ देत नाहीत आणि दुसरीकडे शाळांची खूपच दुरावस्‍था आहे. नक्षलवाद्यांची भीती आणि त्‍यांच्‍या प्रभावामुळे पालक आपल्‍या मुलांना शाळेतही पाठवू शकत नाहीत. हे गडचिरोली जिल्‍ह्यामध्‍ये सर्वत्र दिसणारे दृष्‍य आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी `शिका, संघटित व्‍हा आणि संघर्ष करा` असा मंत्र दिला होता. त्‍यातल्‍या `शिका`लाच जर फुली मारली तर पुढे `संघटित` होऊन `संघर्ष` करण्‍याचा प्रश्‍नच येत नाही. म्‍हणून मला असे वाटते की, ख-या अर्थाने तेथील बदलाची सुरुवात ही शिक्षणातूनच होऊ शकते.

म्‍हणूनच गडचिरोली जिल्‍ह्यातील ५१ मुलांची जबाबदारी घेऊन ती मुले मी पुण्‍याला पाठविण्‍याचा निर्णय घेतला. माझ्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्‍या वसतीगृहामध्‍ये त्‍या मुलांना ठेवून त्‍या शाळेमध्ये शिक्षण देण्‍याचा निर्णयही त्‍या शाळेने घेतला आहे.

पुढची सहा वर्षे गडचिरोलीमधील ही मुले, त्‍यात आदिवासी व बिगर आदिवासी मुले आहेत, ती शिक्षण घेतील. यातील बरीच मुले उद्या शिकून मोठी होतील. त्‍यांच्‍या कुटुंबियांसाठी हा बदल अधिक आशावादी असेल. विकासाची गंगा गडचिरोली जिल्‍ह्यात घेऊन येण्‍याचा हा मार्ग आहे. ही एक पाऊलवाट आहे. याचा राजमार्ग करण्‍याचा प्रयत्‍न आपणा सर्वांना करावा लागणार आहे.

५१ मुलं म्‍हणजे काही संपूर्ण गडचिरोली जिल्‍हा नव्‍हे, पण एक पायवाट दाखवली आहे, तिचा राजमार्ग होऊ शकतो, असा माझा नेहमीचा अनुभव आहे. जेव्‍हा शिक्षण पूर्ण होऊन ही मुलं बाहेर पडतील, उच्‍च, अतिउच्‍च शिक्षण घेतील, वेगवेगळ्या पदावर जातील, त्‍यातील एखादी मुलगी जर पोलीस सेवेत आ‍ली आणि तिच्‍या अंगावर पोलीस अधिका-याचा गणवेश असेल तेवहा तिच्‍या वडिलांच्‍या डोळ्यात येणारे पाणी आणि तीच मुलगी नक्षलवादी म्‍हणून मारली गेल्‍यानंतर तिच्‍या आई-वडिलांच्‍या डोळ्यात येणारे पाणी यातील नेमकी कोणती क्रांती आपल्‍याला हवी याचा विचार नक्षलग्रस्‍त प्रभावी भागातील सर्वच लोक करतील. शिक्षणापासून आणि ज्ञानापासून क्रांती सुरु होत असते. माणूस गुहेतून इथपर्यंत आला तो शिक्षण आणि ज्ञानाच्‍या जोरावरच.

५१ मुलांसाठी आम्ही एक पायवाट तयार केली आहे. तो राजमार्ग बनावा ही माझी अपेक्षा आहे. या पहिल्‍या पावलावर, आपण हे पाऊल पुढे जाईल कसे, त्‍याला मदत कशी होऊ शकेल या दृष्‍टीने सहकार्य करा आणि विचारही करा.  यातून गडचिरोली जिल्‍ह्यातील असंख्‍य आई-वडिलांच्‍या डोळ्यातून सुखाचे अश्रू यावेत, पण आज त्‍यांच्‍या डोळ्यातून येणारे दुःखाचे अश्रू पुसणारे हात पुढे येण्‍याची गरज आहे. त्‍यासाठी ही ५१ मुलं दीपस्‍तंभासारखी मार्गदर्शक ठरतील अशी मला आशा वाटते.

महाराष्‍ट्रातील नावाजलेल्‍या शिक्षण संस्‍थांनी याचे अनुकरण करावे, यातील शैक्षणिक उत्‍थानाला मदत करावी, त्‍या परिसरात शाळाही काढाव्‍यात असे मला वाटते. शासकीय शाळांचा दर्जाही सुधारण्‍याचा माझा आटोकाट प्रयत्‍न सुरु आहे. शिक्षकांच्या मदतीने त्‍यातही मी बदल घडवून दाखवीन.

आज ब्‍लॉगवर मी इथंच थांबतो. पुन्‍हा मी तुमच्‍याशी जरुर बोलेन आणि या संदर्भातच बोलेन. आणि या संदर्भात अजून मला बरंच बोलायचं आहे. ते वेळोवेळी बोलत राहीन. आणि ब्‍लॉगवरुन इतर विषयांवरही बोलायचे आहे तेही बोलत राहीन.

मला आशा आहे की, या महामार्गावरुन जी क्रांती होईल ती क्रांती खरी क्रांती असेल आणि डॉ.आंबेडकरांच्‍या स्‍वप्‍नातली क्रांती असेल. एवढंच मी करु शकतो.

महाराष्‍ट्राचा गृहमंत्री म्‍हणून मला ह्या मुलांची जबाबदारी घेताना स्‍वाभिमान वाटतो तो मी शब्‍दामध्‍ये व्‍यक्‍त करु शकत नाही, तो शब्‍दांच्‍या पलिकडचा आहे आणि या ब्‍लॉगवरचे हे शब्‍द जेव्‍हा संपतील त्‍यानंतर तो अभिमान तुम्‍ही वाचू शकाल अशी मला आशा वाटते.

जय महाराष्‍ट्र!
आर आर पाटील,
गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य

This entry was posted in Post In Marathi. Bookmark the permalink.

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s