स्‍त्री-भ्रृणहत्या थांबवा. नाहीतर….

नमस्कार,

आताच न जाणवणा-या पण भविष्‍यात अनर्थ निर्माण करुन एक मोठे सामाजिक संकट ठरणा-या एका प्रश्‍नावर मी आज माझे मत मांडू इच्छितो.

तो गंभीर प्रश्‍न म्‍हणजे स्‍त्री-भ्रृणहत्‍या. दिवसेंदिवस स्‍त्री-भ्रृणहत्‍या करण्‍याचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेषत: उच्‍च शिक्षित, सधन वर्गामध्‍ये हा विषय चिंतेचा बनत चालला आहे. ज्‍या समाजात, `ज्‍या देशात स्‍त्री ही स्‍वतंत्र आणि विचाराने मुक्‍त असते तोच समाज किंवा देश सुसंस्‍कृत समजावा` असे थोर समाजसुधारक आगरकर यांनी म्‍हटले आहे. भारत जगातील एक वैभवशाली, प्राचीन संस्‍कृती लाभलेले, विकसनशील व कार्यक्षम राष्‍ट्र म्‍हणून गणले जाते. २१ व्‍या शतकात स्त्रियांना स्‍वातंत्र्य आहे, त्‍या घराबाहेर पडतात, शिकतात, नोकरी करुन अर्थार्जन करतात, उद्योग व्‍यवसाय चालवितात, त्‍यांच्‍या नावालाही वलय प्राप्‍त होत आहे. हे चित्र आशावादी असले तरीही या चित्राची दुसरी बाजू मात्र काळीकुट्‍ट आहे, मन विषण्‍ण करणारी आहे. दरवर्षी जवळपास १० लाख मुली जगात येण्‍यापूर्वी म्‍हणजेच गर्भ असतानाच गर्भलिंग निदान करुन बिनबोभाटपणे मारल्‍या जात आहेत. स्त्रि च्‍या स्‍वातंत्र्यावर, तिच्‍या सामर्थ्‍यावर आणि तिच्‍या मुक्‍ततेवर समाजाने लादलेले निर्बंध हे स्‍त्री-भ्रृण हत्‍येचे मूळ आहे असे मला वाटते.


आपल्‍या संस्‍कृतीने `स्‍त्री`ला शक्‍तीदेवता म्‍हणून गौरविले आहे. महालक्ष्‍मी, महासरस्‍वती आणि महादुर्गा ही तिचीच तीन रुपे आहेत. भारतीय संस्‍कृतीने प्राचीन काळापासून स्‍त्रीचे मोठेपण मान्‍य करून तिला सन्‍मानाची वागणूक दिली आहे. त्‍या काळात स्‍त्री सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत होती. लोपामुद्रा, विश्‍वतारा, घोषा यांसारख्‍या विद्वान स्त्रियांच्‍या ऋचा ऋग्‍वेदात आढळतात. वेदातील अनेक सुक्‍ते ही स्त्रियांनी लिहिलेली आहेत. इसवीसनाच्‍या ११ व्‍या शतकापासून भारतावर प‍रकियांची आक्रमणे होत राहिली. स्त्रियांची सुरक्षा धोक्‍यात आली आणि तिचे रक्षण करता येत नाही, हे लक्षात येता `लहाणपणीच तिचे लग्‍न करुन मोकळे व्‍हा` म्‍हणजे आपली जबाबदारी संपली़` या भूमिकेतून स्त्रियांच्‍या बालविवाहाची प्रथा सुरु झाली आणि येथपासूनच ख-या अर्थाने स्‍त्रीच्‍या स्‍वातंत्र्याचा काळाकुट्ट अंध:कारमय कालखंड सुरु झाला. फक्‍त उपभोगाची वस्‍तू म्‍हणूनच स्‍त्रीकडे पाहिले जाऊ लागले.

आज समाज सुधारला, स्‍त्री शिकली, सन्‍मानाच्‍या पदावर पोहोचू लागली. पण असे असले तरी `स्‍त्रीचा जन्‍म म्‍हणजे मोठे अरिष्‍ट आहे` या समजातून आजही समाज बाहेर पडू शकला नाही. काही भागामध्‍ये मुलींचे प्रमाण दर हजारी ८०० पेक्षा कमी झाले आहे. याला जबाबदार कोण? ही परिस्थिती आणखीनच बिघडली तर काय होईल? ही परिस्थिती सुधारण्‍यासाठी काय उपाययोजना आहेत? हे महत्‍वाचे प्रश्‍न त्‍यामुळे उपस्थित होतात. `मुलगा म्‍हणजे वंशाचा दिवा`, `मुलगा म्‍हणजे म्‍हातारपणाचा आधार` असे मत रुढी-परंपरांवर आधारित समाजरचनेने लोकांच्‍या मनावर बिंबवले आहे. या पारंपरिक विचारसरणीमुळे मुलांच्‍या तुलनेत मुलींची घट झालेली आहे.  विवाहानंतर मुलगी परक्‍याचे धन होते, त्‍यामुळे मुलगी नकोच हेही त्‍या पाठीमागचे कारण आहे.

महाराष्‍ट्र शासनाने सन 2002 मध्‍ये प्रकाशित केलेल्‍या मानव-विकास अहवालानुसार, आपल्‍याला किमान एक तरी मुलगा असलाच पाहिजे असे राज्‍यातील ८४ टक्‍के महिलांना वाटते. आधुनिक तंत्रज्ञानाच्‍या सहाय्याने, चोरी-छुप्‍या पध्‍दतीने गरोदर स्त्रिया, तिचे नातेवाईक व काही निवडक डॉक्‍टर मंडळी (मी सर्व डॉक्‍टरांना दोष देत नाही) संगनमताने आणी बेकायदेशीरपणे गर्भंलिंग निदान करुन घेतात व स्‍त्री-भ्रृणहत्‍या मोठ्या प्रमाणावर करतात.

जिजामाता किंवा सावित्रीबाई फुले यांच्‍यासारख्‍या महिला जन्‍माला आल्‍या नसत्‍या तर महाराष्‍ट्राचा इतिहास आहे तसा असता का? या गंभीर प्रश्‍नावर व्‍यापक चर्चा होत नाही आणि यातून सर्वात मोठे दुर्दैव असे आहे की, आपण ज्‍यांना सुशिक्षित म्‍हणजे शहाणा असे म्‍हणतो, ज्‍यांना सधन मानतो असे पालक आणि पैशासाठी आपले वैद्यकीय कौशल्‍य वापरणारे काही डॉक्‍टर्स (सर्व डॉक्‍टर्स नव्‍हे) या गुन्‍ह्यामध्‍ये सहभागी होतात. हा एक मोठा सामाजिक गुन्‍हा आहे. मुलींचे प्रमाण कमी झाले तर आजच्‍या परिस्थितीत एक हजारामध्‍ये २०० मुलांची लग्‍नेच होऊ शकणार नाहीत. आज ज्‍या ८०० मुली जन्‍माला येतात त्‍या तरी सुरक्षित राहू शकतील काय?  त्‍यातून जी असुरक्षितता वाढेल त्‍याला संरक्षण देणे हे जिकिरीचे काम होऊन बसेल. आज राजस्‍थान आणि हरियाणामध्‍ये अन्‍य राज्‍यातून मुली हुंडा देऊन आयात कराव्‍या लागतात त्या यामुळेच .

ज्‍या राज्‍यामध्‍ये किंवा देशात मुलींचे आणि मुलांचे प्रमाण सारखे आहे किंबहुना मुलींचे प्रमाण जास्‍त आहे, ते राज्‍य किंवा तो देश प्रगतीशील आहे. आज केरळमध्‍ये मुलींची संख्‍या जास्‍त आहे. केरळ प्रगतीशील राज्‍य म्‍हणून ओळखले जाते. रशियामध्‍ये मुलींची संख्‍या जास्‍त आहे तर ती जगातील महासत्‍ता मानली जाते. आपण जिजामाता आणि सावित्रीबाई फुले यांचे नांव घेतो, समाजसुधारणेची मोठी परंपरा सांगतो, पण या सामाजिक गुन्‍ह्यामध्‍ये आपण वेगाने प्रगती करत असू तर या पुरोगामीपणाचा इतिहास सांगण्‍याचा आपल्याला अधिकार राहील काय? आज कोणतेही क्षेत्र बघितले, १० वी, १२ वीची गुणवत्‍ता यादी पाहिली, तर मुली मुलांपेक्षा कुठेच कमी नाहीत. पण असे असूनही आज या गंभीर चुका घडतात.

या सगळ्या साखळीमध्‍ये चुकीचे वागणारे काही डॉक्‍टर्स, मोठे तंत्रज्ञ समजणारे गायनॅकोलॉजिस्‍ट हे गुन्‍हे करताना दिसत आहेत (मी सगळ्याच डॉक्‍टरांना दोष देत नाही). पण त्‍यांना हे माहीत नाही की असे मिळविलेले पैसे ते अंतत: आपल्‍या मुलीच्‍या गळ्याला नख लावण्‍याकरिता आहेत. त्‍यांच्‍या मुलांना जेव्‍हा मुली मिळणे बंद होईल तेव्‍हा त्‍यांचे डोळे पांढरे होतील. पण तेव्‍हा वेळ निघून गेलेली असेल. ‘आज म्‍हातारी मरते आहे आणि काळही सोकावतो आहे.’

महाराष्‍ट्राचा गृहमंत्री म्‍हणून मला असे नेहमीच वाटते की यामध्‍ये पोलीस आणि गृह मंत्रालयाने सुध्‍दा अधिक संवेदनशीलपणे वागलं पाहिजे आणि अशा प्रकारच्‍या गुन्‍ह्यांचा तात्‍काळ बंदोबस्‍त केला पाहिजे. काही प्रश्‍न तात्‍काळ आपल्‍यासमोर येतात आणि आपल्‍याला ते महत्‍त्‍वाचे वाटतात. एखादी जबरी चोरी झाली तर तो गुन्‍हा टॉप प्रायोरिटीचा ठरतो आणि गर्भलिंग चिकित्‍सेचा गुन्‍हा मात्र निकड तक्‍त्‍यामध्‍ये खाली जातो. परंतु खरे तर निकड तक्‍त्‍यावरील सर्वात वरचा गुन्‍हा स्‍त्री-भ्रृणहत्‍या मानला गेला पाहिजे. हा मानसिक रोग गरीब माणसांमध्‍ये कमी आहे. म्‍हणूनच नंदुरबार आणि गडचिरोली या अत्‍यंत मागासलेल्‍या जिल्‍ह्यात स्‍त्री-भ्रृण हत्‍येचे प्रमाण अन्‍य जिल्‍ह्यांच्‍या तुलनेत कमी आहे. पण श्रीमंत, उच्‍चभ्रू, नवश्रीमंत यांच्‍यात मात्र स्‍त्री-भ्रृण हत्‍येचे प्रमाण अधिक असल्‍याचे आढळते.

काही डॉक्‍टर्स अशा गुन्‍ह्यांना साथ देतात. हे लोक महाराष्‍ट्राच्‍या सर्वच भागात पसरलेले आहेत. त्‍यांच्‍या विरोधात कायद्याच्‍या आधाराने करावयाची कडक कारवाई आम्‍ही करुच, सरकार आपल्‍या परीने प्रयत्‍न करील. पण लोकांना, मुख्‍य म्‍हणजे स्‍त्रीला, जी बाई आपल्‍या पोटातल्‍या मुलीची हत्‍या करते त्‍या बाईला, एक क्षण असे वाटले पाहिजे की आपण एक बाई आहोत आणि एका मुलीची हत्‍या करीत आहोत. मी हे समजू शकतो की कुटुंबामध्‍ये स्‍त्रीला निर्णय घेण्‍याचा अजूनही अधिकार नाही. त्‍यांना अशा प्रकारचा अधिकार जर मिळाला तर ते मोठे भाग्‍याचे लक्षण मानावे लागेल. हा अधिकार मिळविण्‍यासाठी मोठ्या चळवळीची गरज आहे, असे मला वाटते. महाराष्‍ट्र या पुरोगामी राज्‍यात शाहू, फुले, डॉ.आंबेडकरांचे नांव आपण घेतो. ज्‍या राज्‍यात शेणाचे गोळे अंगावर झेलून सावित्रीबाई फुले यांनी स्‍त्री-शिक्षणाचा पाया रचला, त्‍या राज्‍यामध्‍ये या प्रकारची स्थिती होत असताना डोळे झाकून बसता येणार नाही.

`मुलींना वाचवा आणि राज्‍य वाचवा` अशी घोषणा आता आपण करण्‍याची आवश्‍यकता आहे. लोकाची मानसिकता बदलणे हा सगळ्यात मोठा प्रश्‍न आहे आणि केवळ राजकारणीच ती बदलू शकतील, असे मला वाटत नाही. समाजकारण्‍यांनीही यात मोठ्या ताकदीने उतरण्‍याची आवश्‍यकता आहे. मी हा प्रश्‍न गांभीर्याने घेतला आहे. मला जे अधिकार मिळालेले आहेत, त्‍यांचा वापर “हात जोडून आणि हात सोडून” करण्‍यासाठी मी सदैव तयार आहे. मला आपणा सगळ्यांची कृतीशील साथ हवी आहे. या चुकीच्‍या कामात जे डॉक्‍टर्स सहभागी होत आहेत त्‍यांची आयुष्‍यभरासाठी प्रॅक्टिस बंद करण्‍याचा निर्णय मेडिकल कॉन्सिलने घेण्‍याची गरज आहे. भ्रृणहत्‍या होणा-या मुली तर मरत आहेतच, पण ज्‍या मुली जन्‍म घेत आहेत, त्‍यांचीही भविष्‍यातील सुरक्षितता मी महत्‍त्‍वाची मानतो.

काही कुंटुंबात गरीबी हे सुध्‍दा भृणहत्‍येचे कारण आहे. मुलगी झाली की हुंडयाचा खर्च नको असाही विचार केला जातो. यापुढे मुलगी जन्‍माला आल्‍या बरोबर शासनाच्‍या वतीने तिच्‍या नावावर काही रक्‍कम फिक्‍स डिपॉझिट  मध्‍ये ठेवून ती अठरा वर्षाची झाल्‍याबरोबर तिला पुढील शिक्षणाकरीता किंवा लग्‍नाकरता एक लाख रूपये मिळतील अशी योजना सरकार बनवील. आम्‍ही निवडणुकीत तसे आश्‍वासन आमच्‍या जाहीरनाम्‍यात दिले आहे. ते आम्‍ही पाळूच महाराष्‍ट्रात जन्‍माला येणारी मुलगी लक्षाधिश म्‍हणूनच ती जन्‍माला येईल ती कुंटुंबावर बोजा असणार नाही, तर ती धनलक्ष्‍मी असेल.

आजचा ब्‍लॉग मी इथंच थांबवतो. कौटुंबिक हिंसाचार आणि गर्भलिंग चिकित्‍सा यांचंही एक नातं आहे, त्‍यासबंधी मी माझ्या पुढच्‍या ब्‍लॉगमध्‍ये लिहिन.

आपणा सर्वांना नमस्‍कार!
जय महाराष्‍ट्र!!
आर. आर. पाटील,
गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य.

This entry was posted in Post In Marathi. Bookmark the permalink.

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s