‘नटरंग’ चे अभिनंदन….


प्रिय ‘नटरंग’ कलावंत,

सप्रेम नमस्‍कार आणि `नटरंग’`च्‍या राष्‍ट्रीय पातळीवरील सन्‍मानाबद्दल आपल्‍या सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन !

अस्‍सल मराठी मातीतून निर्माण झालेली ही मराठमोळी कलाकृती आज देशभरात दाद मिळविते आहे. महाराष्‍ट्राला अभिमान वाटेल आणि येणा-या कलावंतांच्‍या अनेक पिढ्या हे यश मनात साठवून ठेवतील अशीच ही घटना आहे.

`नटरंग`ने चित्रनिर्मितीच्‍या प्रत्‍येक बाबतीत बाजी मारली. निर्मिती, लेखन, दिग्‍दर्शन, संगीत, छायाचित्रण, अभिनय, नृत्‍य या सर्वच विभागात `नटरंग` सरस ठरला. विख्‍यात साहित्यिक आनंद यादव यांची हृदयस्‍पर्शी कथा, रवी जाधव यांचं कसबी दिग्‍दर्शन, `झी`ची उच्‍च निर्मितीमूल्‍यं, गुरु ठाकूर यांची सदाबहार गीतं आणि संवाद, अजय-अतुल यांचं कालातीत संगीत, अतुल कुलकर्णी,  सोनाली कुलकर्णी, किशोर कदम इत्यादी प्रतिभावान कलावंतांचा अजोड अभिनय.

या चित्रपटासंबंधी सर्व गोष्‍टी माझ्यासारख्‍या हजारो मराठी चित्ररसिकांच्‍या मर्मबंधातल्‍या ठेवी बनल्‍या आहेत.

चित्रमहर्षि दादासाहेब फाळके यांनी लखलखत्‍या चंदेरी दुनियेचा ‘ओनामा’ केला. त्‍यानंतर शांतारामबापू, मा.विनायकांपासून आपल्‍या सचिन पिळगांवकर, महेश कोठारे आदि हरहुन्‍नरी अशा नव्‍या पिढीच्‍या कलावंतांनी हा ‘वेळू गगनावरी’ नेला. याप्रसंगी राष्‍ट्रीय पुरस्‍काराचे पहिले सुवर्णकमळ आणणा-या`श्‍यामची आई आणि आचार्य अत्रे यांची मला आठवण होते. त्यांना मी अभिवादन करतो. तसेच काही वर्षापूर्वी आलेल्‍या `श्‍वास` या चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्‍टीचं भवितव्‍य उज्‍ज्‍वल असल्‍याची चुणूक दाखवली होती. `नटरंग’ च्‍या रुपानं मराठी चित्रपट पुन्‍हा ऐश्‍वर्याने लखलखू लागला आहे अशी सुखद जाणीव मला होत आहे.

लावणी आणि संगीतबारी म्‍हणजे अवघ्‍या महाराष्‍ट्राच्‍या लोकसंगिताचा अंतःस्‍वर. या लावणीवर अनेकांनी आपला जीव ओवाळून टाकला. कुणी मिशा पिळत आपलं रसिकत्‍व दाखवलं, तर कुणी शेकडो वर्षे लोक गुणगुणत राहतील अशा अप्रतिम लावण्‍या, वग, गवळणी पेश केले. सामान्‍य मराठी मनाला वेडं करणा-या या लोककलेची सेवा सोपी नव्‍हती. संसारावर निखारा ठेवूनच ही सेवा व्‍हायची आणि आजही ती तशीच होते.

लोककलावंतांचं जिणं किती भयानक असू शकतं याची जाणीव `नटरंग`नं करुन दिली. विकासाच्‍या ओढीनं आपण वेगानं दौडत असताना लोक-कलावंतांचा एक जथ्‍था, आपल्‍याच समाजाच्‍या कोप-यात दिवाभितासारखा जगतो आणि कोरभर भाकरीसाठी धडपडतो आहे, ही जाणीव निश्चितच अस्‍वस्‍थ करणारी आहे.

या कलावंतांसाठी सरकारचा एक घटक म्‍हणून काही तरी करण्‍याचे मनात आहेच. या निर्मितीमध्‍ये समाविष्‍ट असलेल्‍या सर्व कलावंतांना आणि बिगर-कलावंत, तंत्रज्ञांना माझ्या लाख-लाख शुभेच्‍छा !   त्‍यांच्‍यासाठी माझ्याकडून जे काही होईल ते मी करीन याची ग्‍वाही देऊन मी थांबतो.

नमस्कार,

जय महाराष्ट्र.
आर. आर. पाटील,
गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य.

This entry was posted in Post In Marathi. Bookmark the permalink.

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s