संकल्प नव्या वर्षाचा…. ‘समृद्ध-सुरक्षित’ महाराष्ट्राचा

नमस्कार,

आज, १ जानेवारी…

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे जावो या  नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी प्रारंभीच आपल्याला देतो.

राज्यातील जनतेला निर्भय वातावरणात जगता यावं, यासाठी आम्ही नेहमीच दक्ष राहिलो आहे. यापुढच्या काळात  महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच त्यांची विशेष काळजी घेण्याची जबाबदारी एक ‘मिशन’ म्हणून आम्ही स्वीकारली आहे. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतानाच त्यांच्याशी संबंधित गुन्हे   करणा-यांची आणि असे गुन्हे करणा-यांना पाठीशी घालणा-यांची  कदापि गय केली जाणार नाही, याची ग्वाही मी आपणाला या नवीन वर्षाच्या निमित्ताने देत आहे.

दिल्लीत घडलेल्या गंभीर घटनेने महिला अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला. महिलांवरील अत्याचाराची आम्ही यापूर्वीच गंभीर दखल घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना यापूर्वीच सुरु केल्या आहेत.  महिला अत्याचाराच्या संदर्भातील कायदे अधिक कडक करणे, संवेदनशीलपणे त्याची दखल घेणे  अशा विविध उपाययोजनांना प्राधान्य दिले आहे.  महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे विविध निर्णय, निर्देशांची आणि  कायद्यांची माहिती पोलीस ठाण्यात काम करणा-या सर्व अधिकारी-  कर्मचा-यांना व्हावी याकरिता कार्यशाळांचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे.

महिला अत्याचारविरोधी कायद्यांतील त्रुटी दूर करुन हे कायदे  अधिक कठोर करण्याचा आमचा मानस आहे. भारतीय दंड संहिता व फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये   केंद्र सरकारने तातडीने बदल करावा, अशी सरकारची भूमिका असून यापूर्वीच केंद्राला आम्ही शिफारस देखील केली आहे.  महिलांच्या संदर्भातील खटले लवकर निकाली काढण्यासाठी राज्यातील एकूण १००  जलदगती न्यायालयांपैकी २५  जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालये वेगळी करुन त्यात दररोज सुनावणी ठेवण्याबाबत उच्च न्यायालयाला विनंती करण्यात येणार आहे.

महिला अत्याचार रोखण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य असून दीड वर्षापूर्वी महिला अत्याचारांचा आढावा घेऊन शिफारशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.

महिला तक्रारदारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. त्यात महिलांचे जबाब घेताना सौम्य भाषा वापरावी. शक्यतो, महिला तक्रारदारांचे जबाब महिलांनीच घ्यावेत, जेथे महिला अधिकारी कमी असतील तेव्हा पुरुष अधिका-यांनी महिला पोलीस शिपायांसमक्ष जबाब नोंदविण्याच्या सूचना पोलीसांना दिल्या आहेत. वरिष्ठ पोलीस  अधिका-यांनी महिलांच्या तक्रारीच्या प्रकरणांमध्ये विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. या तक्रारींची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेतली नाही तर संबंधितांना जबाबदार धरुन त्यांच्यावर प्रसंगी कारवाईचा बडगा उगारला जाईल. येत्या काळात महिला अत्याचाराच्या संदर्भातील तपासी यंत्रणांमध्ये बरेचसे बदल झालेले दिसतील.

गुन्हेगारांना जरब निर्माण होईल, अशा ‘पोलीसी’ उपाययोजना करण्याबरोबरच ‘कम्युनिटी पोलीसिंग’वर भर देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याची चांगली सुरुवात देखील केली आहे. आमचे पोलीस अधिकारी-कर्मचारी अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याबरोबरच सुरक्षेचे धडे देताहेत. गाव-खेड्यात तसेच शहरांच्या विविध वार्डांत , शाळा- कॉलेजेसमध्ये पोलीसांचे अस्तित्व लोकांना दिसेल, जाणवेल अशा पद्धतीने पोलीस काम करताहेत.

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा विषय देखील अलिकडे महत्त्वाचा आणि प्राधान्याचा विषय ठरु पाहतोय. या विषयाला एक सामाजिक पदर लाभला आहे. `वसुधैव कुटुम्बकम’ अशी आपली संस्कृती असल्याचे आपण सांगत असलो तरी सध्या `मी आणि माझे’ एवढय़ापुरतेच आपले विश्व सीमित झाले आहे.  एकीकडे वाढलेले आयुर्मान, दुसरीकडे  एकत्र कुटुंबपद्धतीचा होत असलेला -हास , मुलगा-सून दोघेही कामावर , किंवा विदेशात नोकरीनिमित्त स्थिरावलेली…  घरी कुणी नाही ,त्यामुळं एकाकीपणे जीवन जगणारे ज्येष्ठ नागरिक…त्या एकाकीपणाचा फायदा घेऊन चोरीकरिता किंवा अन्य कारणास्तव होणा-या हत्या…यामुळे ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता हा आमच्यासाठी प्राधान्याचा विषय ठरला आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाईनसारखे उपक्रम प्रारंभी सुरु केले, त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. नंतरच्या काळात मुंबईत माझ्यापासून ते थेट पोलीस शिपायांपर्यंत प्रत्येकाने ज्येष्ठ नागरिकांशी स्वतःला जोडून घेतलं.. वृद्ध नागरिकांना महिन्यातून एकदा पोलिसांनी भेट देण्याचा उपक्रम नेमानं सुरु आहे. त्यात आम्हाला चांगलं यश लाभलंय. सुरक्षेसाठी सुरु केलेला हा उपक्रम आता भावनिक स्तरावर जोडला गेल्यानं पोलीस आणि ज्येष्ठ नागरिकांचं एक वेगळं नातं निर्माण होऊ पाहत आहे.  हाच उपक्रम आता औरंगाबाद, नागपूर व पुणेसारख्या मोठ्या शहरांसाठी राबवण्यात येईल. एकूणच, ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी आणि मदतीसाठी आमची यंत्रणा सदैव कटिबद्ध आहे.

देशाचा भावी आधारस्तंभ म्हणून ज्यास ओळखले जाते त्या बालकांना सक्षम केले तरच सक्षम भारताची निर्मिती भविष्यात होईल. म्हणून बालकांच्या सक्षमीकरणाची जशी सरकारची जबाबदारी आहे, तशी ती सामाजिक जबाबदारी देखील आहे. मुलं ही राष्ट्रीय संपत्ती आहे मात्र, या राष्ट्रीय संपत्तीला शाळा आणि खेळापासून दूर करुन कामाला जुंपणा-या प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे ठरवले आहे.बालकामगारांची कामातून मुक्तता करुन त्यांचा शिक्षणाचा आणि खेळण्याचा हक्क त्यांना परत मिळवून देण्यासाठी शासन यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाईल. बालवयात प्रौढांसारखी कामं करुन बालपण करपलेल्यांच्या चेह-यावर आता हसू उमलू देण्याचा आमचा प्रयत्न आहे. गट्टे पडलेल्या हातात वही-पेन घेऊन हरवलेलं बालपण त्याला परत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. याकामात आम्हांला आपल्या सर्वाचं सहकार्य अपेक्षित आहे.

आज, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी माझ्या ब्लॉगवरुन आपणाशी संवाद साधताना मला आनंद  होत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या प्रती आम्ही जागरुक आहोत, आमची यंत्रणा दक्ष आहे. कुणाचाही मुलाहिजा न बाळगता आम्ही या घटकांच्या सुरक्षेसाठी सदैव तयार आहोत…..आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून ‘समृद्ध महाराष्ट्र-सुरक्षित महाराष्ट्र’ घडविण्याचा यानिमित्ताने संकल्प करुया….

आपल्या अनमोल सूचना, अभिप्राय जरुर कळवा, त्याचा निश्चितच विचार करु…..

पुनश्च: एकदा आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा…..

-आर.आर.पाटील

 गृहमंत्री (महाराष्ट्र राज्य)

This entry was posted in Post In Marathi. Bookmark the permalink.

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s